आठवण

आठवण कधी आणि कोणती येईल याचा काही नेम नसतो. आणि त्यात कुठे बाहेर असताना एखादा मजेदार किस्सा आठवला आणि जरा हसलं तर दुसरा लगेच विचार करतो की याची ‘गोळ्या घ्यायची वेळ’ जवळ आली आहे. खरतरं स्वत:च्याच धुंदीत असल्यावर वरील गोष्टीची ‘झळ’सुद्धा लागत नाही.

कोणीतरी म्हटलयं, “आठवणी या मुंग्यांप्रमाणे असतात. एक मुंगी बाहेर आली की तिच्यामागे सगळ्या मुंग्या बाहेर येतात.” मी नाही मानत! हा काय ramp walkचा प्रकार थोडीच आहे ज्यात आठवणी एका मागुन एक येतात आणि आवडीची नसेल तरी त्या आठवणीकडे लक्ष द्याव! ही तर जबरदस्ती! आठवणी म्हणजे ३१ डिसेंबरच्या party सारख्या असतात. या पार्टीत सगळ्या प्रकारच्या ‘आठवणी’ असतात पण ह्रदयाला ‘आवडणारी’ अशी एक किंवा अनेक ‘आठवणींवरच’ लक्ष असतं. असो.

पुढे अशा ‘आवडत्या आठवणींचा’ एक संग्रह तयार होतो. मनात या संग्रहाला उच्च स्थान दिलं जातं. ह्या संग्रहात वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी असतात. काही आठवणी शाळेच्या, शिक्षकांनी शिक्षा केल्याच्या, भांडणं झालेल्याच्या तर काही college life च्या, मित्रांबरोबर अभ्यास, टपरीवरची चहा, submission ची गडबड. काही जणांकडे लोकांच्या आठवणीपण असतात. हा सगळ्यात ‘नाजुक’ प्रकार असतो. कारण खुप वेळा या ‘लोकांच्या आठवणी’ मध्ये ‘त्याची’/’तिची’ आठवण असते. एखाद्या चित्रपटात प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध दाखवला जातो. कथेनुसार प्रियकर खुप प्रयत्न करतो पण त्याला ‘यश’ येत नाही. शेवटी तिला प्रेमाने म्हणतो ” मी तुझ्या आठवणीत संपुर्ण आयुष्य काढेन.” Shooting संपतं न् संपतं तोच हा पठ्या तिथुन निसटतो आणि हातपाय न धुताच ‘तिला’ भेटायला जातो. एका दिवसाचा पण धीर धरता न येणारा हा प्राणी चित्रपटात आयुष्य आठवणीत काढायच्या गोष्टी करतो.

आठवणी ह्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याचा संग्रह आयुष्यभर वाढतंच जातो. आनंदाचे क्षण नेहमीच मनात महत्त्वाच स्थान करुन जातात. हे क्षण, ह्या आठवणी प्रत्येक जण नेहमी ह्रदयात जतन करुन ठेवतो, अगदी शेवटपर्यंत!

Comments are closed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: