“एवढ्या वर्षानंतर भेटतोय आपण तर कुठेतरी जवळ फिरायला जाऊया सगळे” योगेश म्हणाला.
“हो चालेल ना! प्रतिशिर्डी वगैरे जाऊ. जवळ पण आहे. २-३ तासात येऊ परत. काय म्हणतो गौरव?” किरणने विचारलं.
मी तर तयारचं होतो, पण सगळ्यांनाच जमणार नव्हतं. कोणाला बाहेर जायचं होतं, कोणाचं project work होतं, कोणी आजारी होतं.
“मी कुठेही यायला तयार आहे. तुम्ही फक्त कुठं जायचयं ते ठरवा” निहा म्हणाली. ती खरचं excited होती. पण तेवढ्यात तिला एक call आला आणि तिच्या चेहऱ्याच्या हाव-भावावरुन समजलं की तिलाही यायला जमणार नव्हतं.
“तुम्ही या जाऊन. Cancel नका करु.” निहा म्हणाली.
जायच तर होतचं. शेवटी मी, योगेश, निरंजन आणि किरण अशा चार जणांचं जायचं पक्क ठरलं. कोणाची bike घ्यायची आणि कोणाची ठेवायची असला प्रकार झाल्यानंतर आम्ही प्रवासाला सुरवात केली. २ किमी पण झाले नसतील तेवढ्यात ढगाळ वातावरणाकडे बघुन किरण मला म्हणाला, “four wheelerने जायचं का?”
“आहे का four wheeler?”
“आहेना योगेशकडे!”
“अरे मग घे bike बाजुला.” मी म्हणालो आणि योगेशला विचारलं,
“अरे योगेश, four wheeler कुठे फिरायला गेलीये का?”
“नाही रे घरीच आहे. का?”
“चल मग four wheeler नेच जाऊ” मी म्हणालो.
Bikes परत फिरवल्या आणि योगेशच घर गाठलं. घरासमोर एकेकाळचं दशक गाजवलेली मारुती ८०० दिमाखात उभी होती. आम्ही गाडीत बसलो. तेवढ्यात पाऊस पडु लागला. सरकारी कचेरीत (काही अपवाद वगळता) जसा निवांत कारभार चालतो अगदी तेवढ्याच निवांतपणे पावसाचे टपोरे थेंब windshield वर पडत होते.
“चला ताम्हिणी जाऊ!” योगेश म्हणाला. एखाद्या अमृतवाणी सारखे त्याचे शब्द आमच्या मनाला भिडले. अर्थात आमचं excitement अजुन वाढलं. योगेशने गाडी सुरू केली आणि मग सुरू झाला अनपेक्षित प्रवास, ताम्हिणीचा.
आमची गाडी जशी मार्गाला लागली तशी तिने झाडे, घरे आणि पुढे हिंजवडीतल्या MNC कंपन्यांना मागे टाकले पण खड्ड्यांना मात्र शेवटपर्यंत मागे टाकु शकली नाही. कारण खड्डे आणि रस्त्यांमधलं प्रेमाचं नातं अतुट आहे. मी तर म्हणतो, उगाच Romeo-Juliet किंवा हीर-रांझा असल्या जोडप्यांचा प्रेमात आदर्श ठेवण्यापेक्षा खड्डे-रस्ते या जोडप्याचा आदर्श ठेवावा. कारण यांच नातं ऊन्हाळा, हिवाळा, पावसाळा कशालाच जुमानत नाही आणि ते वर्षानुवर्षे टिकवलयं त्यांनी! आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराबरोबर ४००० किलोमीटरचा प्रवास करुन प्रदूषणाने वेढलेल्या प्रेमाचं प्रतिक (!) म्हणवणाऱ्या वास्तुचं दर्शन घेण्यापेक्षा जवळच असलेल्या रस्ते आणि खड्डे यांच्या एकरूपतेचं दर्शन घ्यावं. निदान त्यातुन प्रेमाची परिभाषा तरी कळेल!
थोड्यावेळानंतर योगेशने एका दुकानावर गाडी थांबवली. आम्ही खायच्या वस्तु घेतल्या आणि पुन्हा प्रवासाला सुरूवात केली.
“योगेश, मी चालवु का गाडी?” किरणने विचारलं.
“चालेल ना” असं म्हणुन त्याने मोकळ्या जागेवर गाडी थांबवली.
“तु कधी शिकला गाडी?” योगेशने विचारलं.
“अरे एक वर्षाआधी शिकलोय, पण जास्त कधी चालवलीचं नाही” गाडी चालवणारा किरण म्हणाला.
मी किरणच्या शेजारीच होतो. माझ्या लक्षात आलं की मी seat belt लावला नव्हता. मी तो पटकन लावला. पण हे बघुन किरण म्हणाला,
“अरे गौरव, एवढी पण वाईट नाही चालवत रे मी गाडी. License पण आहे माझ्याकडे दाखवु का?”
“ते राहु दे, तु driving वरच लक्ष दे सध्या” मी म्हणालो.
काही वेळाच्या प्रवासानंतर डोंगरांनी आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झांडांनी आमचं स्वागत केलं. कधी माळरान, तर कधी डोंगरांच्या विलोभनीय दृश्यांनी आमचं लक्ष वेधलं. ऊन-सावलीचा खेळ, पाऊस, थंड हवा यामुळे वातावरण अगदी मोहक वाटतं होतं. काही वेळानंतर आम्ही ताम्हिणीला पोहोचलो. ऐव्हाना पावसाने जोर धरला होता. गाडीमधुन उतरल्यावर आम्ही जवळच असलेल्या दुकानाचा आडोसा घेतला.
“जायचं का पुढे? कारण इथे पाऊस असाच पडत राहील” योगेश म्हणाला.
“चला मग. असं किती वेळ थांबणार इथेचं!” मी म्हणालो.
थोडा वेळ चालल्यानंतर ओढा दिसला. दृश्य अगदी नयनरम्य होतं. पडणारा पाऊस, आजुबाजुला असणारी भरपुर झाडे, त्यामधुनच धो-धो वाहणारा ओढा आणि दगडांवर आदळुन होणारी पाण्याची खळखळ असं ते निसर्गमय दृश्य विलोभनीय होतं. बरेच पर्यटक नजरी पडले. पाण्यात ऊड्या मारणारे, किंचाळणारे, ओरडणारे, पाणी उडवणारे अशा बऱ्याच नमुण्यांचा तो समुह होता. आम्ही सुद्धा त्यामध्ये सामील झालो ते photo आणि selfie काढणारे नमुने म्हणुन. पडणाऱ्या पावसात आम्ही कसेतरी photo काढत होतो. नंतर नंतर निघत नसतानाही कसतरी तो mobile भिजलेल्याच रुमालाने पुसून photo काढायचा प्रकार आम्ही चालवला.
थोड्यावेळानंतर आम्ही तिथुन गाडीकडे निघालो. जाताना जवळच्या दुकानातुन कणीसाचा मंद सुवास येऊ लागला. आम्ही आपोआपच आकर्षित झालो. एक आजी लालभडक निखाऱ्यांवर मक्याचं कणीस भाजत होती. आम्ही पण order दिली. लालभडक व कधी केशरी रंगाच्या जळणाऱ्या निखाऱ्यांवर आमचे कणीस भाजताना तांबूस होताना बघायची मजा वेगळीच होती. भाजुन झाल्यावर तिखटमीठ लावलेले व लिंबू पिळलेले ते कणीस आम्ही पडत्या पावसाचा मनमुराद आनंद घेत खाल्ले.
कणीस खाऊन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. गाडीत आमच्या बऱ्याच गप्पा गोष्टी रंगल्या. गप्पा मारता मारता प्रवास कधी संपला याची जाणीव सुद्धा झाली नाही. १३ वर्षानंतरच्या त्या भेटीने घडवुन आणलेली ती अनपेक्षित सफर, दिवसाच्या सरतेशेवटी आठवणींच्या कप्प्यात कायमची जागा करुन गेली.
Hi Gaurav, would love to see more photographs.
LikeLike
Sure!
LikeLike
Unfortunately I don’t have much photographs. All are selfies. When I will visit next time I will surely take some landscapes!
LikeLike