कुने फॉल्स – एका अनोळखी वाटेवरचा प्रवास (भाग – २)

चैतन्यच्या प्रश्नाला ‘कोणाला तरी विचारु एकदा’ असं उत्तर मिळालं. काही क्षण तिथेच थांबल्यानंतर एका गृहस्थाला चैतन्यने विचारलं, “काका कुने फॉल्स चा रस्ता कोणता आहे?”

आम्ही ज्या दिशेने आधी जात होतो, त्याच दिशेला हात दाखवत ते म्हणाले, “इकडून सरळचं आहे रस्ता”

” तरी किती वेळ लागेल?”

” अजुन १०-१५ मिनीटे लागतील” त्या गृहस्थांनी उत्तर दिलं.

“Thank you!” असं म्हणत चैतन्यने U -Turn घेतला आणि आमची गाडी पुन्हा धावू लागली.

          खड्डे आणि दगडांच्या कच्च्या रस्त्याला सुरूवात झाली तसा आमच्या गाडीचा वेग ५० वरुन १० वर आला. त्यातच प्रवासाला २५ मिनीटे झाली तरी डोंगरातुनच काय रस्त्यावर पण पाणी पडल्याचा प्रकार आम्हाला दिसला नव्हता. मानवी वस्तीचं कोणत्याही प्रकारचं चिन्ह दिसत नव्हतं. अशा खडकाळ, अनोळखी रस्त्यावर कोणी भेटेल याची शाश्वती कमी होत चालली होती. तेवढ्यात कुठलंतरी साहसी क्रिडाप्रकाराचं resort आम्हाला दिसलं. भल्यामोठ्या गेटसमोर ऊभ्या असणाऱ्या ४ सुरक्षारक्षकांना आम्ही आमचा प्रश्न विचारला.

“हाच आहे रस्ता. पुढे अर्धा तास तरी लागेल अजुन” त्यांच्यापैकी एकाचं हे ऊत्तर ऐकुन आमचा जीव भांड्यात पडला. आमची गाडी पुन्हा मार्गाला लागली.

          आमच्या मार्गावर दोन्ही बाजुला झाडे – झुडपे होती. तेही अगदी हिरवीगार! कुठे उंचच उंच झाडं तर कुठे फक्त झुडपं, ज्याच्या कमी ऊंचीमुळे आभाळाला आव्हान करणारी भव्य डोंगररांग नजरी पडत होती. आमची गाडी याच डोंगरांच्या कुशीत असलेल्या नागमोडी वळणांच्या वाटेवरुन जात होती. प्रत्येक वळणानंतर निसर्गाचं चित्रही बदलत जात होतं. हिरवाईने नटलेलं कधी लांबच लांब मैदान, कधी झाडा-झुडपांना कुशीत घेतलेल्या टेकड्या, तर कधी परिसराला वेढा घालणाऱ्या डोंगरांचे आकाशाला भिडणारे ऊंच कडे आम्हाला साद घालतं होते. क्षणा – क्षणाला बदलणारं चित्र निसर्गाचं सौंदर्य खुणावून दाखवत होतं. लाल – पिवळ्या रंगांची लहान मोठी फुलं, हिरव्या रंगांच्या विविध छटांच्या पानांनी नटलेली झाडं, हे त्याच्या सौंदर्यात भर घालत होते. निसर्गाने जणु त्याच्याकडे असलेल्या अलंकारांचं प्रदर्शनचं मांडलं होतं!
पुढे मोकळी जागा दिसल्यावर मयुरने गाडी थांबवायला सांगीतली. “अरे इथेच थांबू आता. किती वेळ झाला फक्त प्रवासच करतोय आपण. आणि आपल्याला व्यवस्थित माहीत पण नाहीये अजुन फॉल्स किती लांब आहे ते. इथेच क्रिकेट खेळु, खाऊ, बसु थोडावेळ आणि मग जाऊ घरी.” मयुर म्हणाला. त्याच म्हणनं बरोबर होतं कारण गाडीचा trip meter आता ९० किमी दाखवत होता. ‘मी उगचं ही जागा सुचवली, माझ्यामुळे ट्रिपची मजा खराब झाली’ असा विचार मनात आला. पण पुढच्याच क्षणाला स्वाती अगदी ओरडलीच, ” मुझे कुझ नही पता! मुझे बस कुने falls चाहीए, कुने चाहीए! चलते हैं आगे. और वैसे भी यहा पर कैसे क्रिकेट खेलेंगे हम लोग? ढंग की जगह भी नही हैं ये!” मग स्मिता पण म्हणाली, “जाऊन बघु थोडं पुढे आणि नसेल काही तर ‘Road trip’ समजुन घरी जाऊ.” एवढा वेळ शांत बसलेल्या चित्रांशने सुद्धा संमती दर्शवली, “चलते हैं!”
” तुला काय वाटतं GOU?” मयुरने विचारलं.

“जाऊया पुढे!” मी म्हणालो.

तेवढ्यात एक गाडी परतीचा प्रवास करत आमच्या दिशेने येताना दिसली. आम्ही त्यांना थांबवलं व विचारलं, “कुने फॉल्स नक्की किती लांब आहे अजुन आणि रस्ता कसा आहे?”

“रस्ता खराब आहे पण तुमची गाडी जाईल. अजुन १० मिनीटांचा रस्ता आहे. बिंदास्त जावा. तुमची गाडी व्यवस्थित जाईल काहीच problem येणार नाही.” त्यांना Thank you म्हणत आम्ही आमचा photo काढायचा उद्योग सुरू केला.

“अरे तुम्हाला ऐकु येतोय का तो आवाज?” आमच्यापासुन काही अंतरावर ऊभ्या असलेल्या शुभमने विचारलं. आम्ही शांत होऊन कान दिले. तो आवाज दुसरा कुठलाच नसुन ऊंचावरुन पडणाऱ्या पाण्याचा होता! आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि प्रवासाला नव्या ऊत्साहाने सुरूवात केली.

          पुढचा रस्ता अजुनच अरूंद आणि खडकाळ झाला. पण २.२ लिटरचं mhawkचं engine असलेली आमची SUV मात्र न थांबता अडथळे पार करत पुढे चालली होती. या वाटेवर उजव्या बाजुला उंच डोंगर तर डाव्या बाजूला खोल दरी होती. खोल दरीलाच लागून काही अंतरावर डोंगर रांग होती. संपूर्ण प्रदेश हिरवळीने नटला होता. निसर्गाने जणु अंगावर हिरवीगार चादर ओढली होती असं वाटत होतं. काही वेळाच्या प्रवासानंतर  आमच्या उजव्या बाजूला डोंगरावरून पडणारे पाणी दिसलं. पाणी उजवीकडून येऊन वाटेवरून वाहत डावीकडे असणार्‍या दरीमध्ये पडत होतं. आम्ही गाडी लावली आणि सर्वजण गाडीतून उतरलो. पाण्याची खळखळ आता अगदी स्पष्ट ऐकू येत होती. मयूर काही अंतरावर असणाऱ्या दोन गृहस्थांना कुने फॉल्स बद्दल विचारून आला. “अरे ते म्हणताहेत की पुढे कुने फॉल्स वगैरे नाहीये. म्हणजे मग हाच असेल फॉल्स.” पोहोचलो एकदाचं! मी सुटकेचा निश्वास सोडला कारण ‘एवढा प्रवास करून फॉल्स पर्यंत जाऊ शकलो नाही व माझ्यामुळे ट्रिपची मजा कमी झाली’ या गोष्टींची खंत मला वाटणार नव्हती. सर्वजन फॉल्स जवळ गेले. दगडं खूप मोठी होती. पाण्याच्या प्रवाहाच्या सातत्यामुळे त्यांचा आकार मात्र streamlined झाला होता. आम्ही त्या निमुळत्या, घसरट पृष्ठभाग झालेल्या दगडांवर कसातरी पाय ठेवत, एकमेकांचा हात धरून कोरड्या दगडांवर जाऊन बसलो. फोटो काढणे, आरडाओरड करणे (आमच्या व्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीच नव्हतं), एकमेकांवर पाणी उडवणे, खाणे वगैरे अशा गोष्टी केल्या. नंतर निवांतपणे त्या स्वच्छ दिसणाऱ्या थंड पाण्यात पाय टाकून बराचं वेळ आम्ही बसलो.

          दीडदोन तास तिथेच घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतताना ‘ठरलेले ठिकाण गाठले’ या गोष्टीचं समाधान वाटत होतं. दीड तासाचा तो प्रवास बडबड करत, मस्ती करत संपवला. डोंगराच्या कुशीत वसलेला कुने फॉल्स कधीच मागे राहिला होता पण पाण्याची ती खळखळ आणि अनोळखी वाटेवरील त्या adventurous वाटचालीची आठवण तो आमच्या आयुष्याच्या शिदोरीत कायमची देऊन गेला.

(समाप्त)

(१८० किमी अंतर व त्यात २० किमीचा अत्यंत अवघड आणि खडकाळ रस्त्यावर कोणतीही तक्रार न करता सावधपणे ड्राइव्ह करणाऱ्या चैतन्यला आणि कोणतीच आशा दिसत नसताना सुद्धा ‘मुझे कुने फॉल्स चाहिये बस’ असं ठामपणे सांगणाऱ्या स्वातीला माझा हा लेख समर्पित.)

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: