(दहावी फ ची ट्रिप पासुन पुढे)
“अडीच तीन तासात आपण पोहोचून जाऊ” ड्रायव्हर म्हणाला. म्हणजे पहाटे साडेचारला पोहोचून करायचं तरी काय हा प्रश्न मला पडला.
“हळूहळू जाउद्या, आपल्याला घाई नाहीये” अभिजीत म्हणाला.
सचिन पुढच्या सीटवर बसला होता. त्यानंतर मी, निरंजन, योगेश, शुभम आणि अभिजीत भाऊ. शिवानंद, अमित, परमवीर, रोहित आणि अभिजीत यांनी मागेच ‘बसणं’ prefer केलं. रात्र अगदी निरभ्र, पण तारे वगैरे काही जास्त दिसत नव्हते. एका कोपऱ्यात चंद्र त्याची ड्युटी करत होता. दिवसा गजबजलेला असणारा आणि वैताग आणणारा डांगे चौक शांत झोपला होता. त्याला डिस्टर्ब न करता आम्ही मुंबई बंगलोर हायवे ला आलो. गाडीमध्ये मस्ती चालुच होती. गाणे लावून नाचणे वगैरे. धडधाकट व्यक्ति व्यवस्थित जाऊ शकणार नाही अशी ती जागा होती, तिथं आमची मित्र मंडळी वेडी-वाकडी अंग करुन नाचत होती. थोड्यावेळाने टोलनाका आला. टोल वगैरे भरला पण पुढे असणार्या पोलिसांनी गाडी बाजूला घ्यायला सांगितली. तिथे मॅटर सोडवला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बाहेर बरीच traffic होती. माझं सहजच लक्ष एका लाल रंगाच्या स्कॉर्पिओ वर पडलं आणि internship ची माझी पवनेची ट्रिप आठवली. त्याचसोबत स्वाती, चैतन्य, स्मिता, मयुर, शुभम, अमेय, चित्रांश यांचे चेहरे डोळ्यांसमोरुन पळत गेले.
पहाटेचे सव्वा तीन वाजले होते. अर्ध्याहून अधिक प्रवास अजूनही बाकी होता.
“अरे गौरव, तु झोप. मी आहे जागा टेंशन नको घेऊ” योगेश म्हणाला.
मी विचारांतून भानावर आलो तेव्हा बहुदा सगळीच मंडळी झोपली होती. “नाही रे, झोपच लागत नाहीये. दे गाणं बदलतो” असे म्हणत योगेश कडून त्याचा मोबाईल घेतला आणि सहजच गाणी शोधू लागलो. आवडतील ती एक दोन गाणी मंद आवाजात लावली आणि परत आपल्या आपल्या जगात फिरायला निघून गेलो व मनात आलं ते गाणं गुणगुणायला सुरुवात केली.
“अरे गौरव कोणतं गाणं म्हणतोय तु!?” योगेश ने विचारलं.
“काही नाय रे. अपनेही धुन मे खोया हुआ इंसान हुं मै” मी म्हणालो.
“तरीच म्हटलं गाणं लावलं कोणतयं आणि तु म्हणतोय कोणतं!” Sarcastic योगेश.
बराच प्रवास आता झाला होता. हवेतला गारवा एव्हाना थोडा वाढला होता. मोठे मोठे कारखाने मधे मधे दर्शन देत होते. त्या चिमण्यांमधुन निघणारा धूर, ते मोठ-मोठाले lights लक्ष(?) वेधून घेत होते. काका आपण मागचा turn घ्यायला पाहिजे होता .योगेश map बघत म्हणाला. चार सव्वाचार वाजले होते. आम्ही रस्ता चुकलो होतो.
“अरे योगेश, ते स्पीड ब्रेकर डिलीट कररे” अगदी झोपेत असलेला परमवीर म्हणाला. झोपेत कोणी काय बोलू शकतो याचा उत्तम नमुना मी त्यादिवशी रात्री पाहिला. पुढे ‘Way to kashid beach’ असा board दिसला. तिथुन आमच्या स्वारीने turn घेतला. आमची गाडी मार्गी लागली.
घड्याळीत पावणे पाच वाजले होते. आमची गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि जागे असणारे सगळे जण खाली उतरले. उतरल्या उतरल्या लाटांचा भला मोठा आवाज कानी पडला. वातावरणात अगदी निरव शांतता. लाटा आणि पक्षांचा विलोभनीय आवाज सोडला तर दुसरा कशाचाच आवाज नव्हता. मधूनच एखादी दुसरी गाडी त्या शांततेचा भंग करी. खरं तर अजून खूप काळोख होता. आकाशात चांदण्यांची मैफिल सजली होती! लाखो चमचमणारे तारे जणु night सेलिब्रेशनच करत होते तिथं! सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. आम्ही टॉर्च लावून किनाऱ्यावर गेलो. एका बाजूला आमच्यासारखेच भटके आधीच येऊन थांबले होते. त्यांचा काहीतरी गोंधळ चालु होता. आम्ही जास्त पुढे वगैरे गेलो नाही. selfie वगैरे घेतली आणि आमच्या गाडीकडे आलो. तिथे थोडे जाड बारीक काड्या शोधल्या आणि मस्त शेकोटी लावली. गाडीत सचिन, अमित, अनिकेत मात्र गाढ झोपेत होते.
काशीद अजूनही झोपलेलाच होता. पूर्वेकडे धूसर प्रकाश दिसू लागला आणि पश्चिमेकडे लुकलुकणारे तारे! काशीदला सकाळच्या साखरझोपेत पडावं असं ते स्वप्न होतं! प्रकाश वाढु लागला तेव्हा सर्व स्पष्ट दिसू लागलं. किनाऱ्यावर बरीच मंडळी होती. दहा पंधरा जणांचा ग्रुप एकीकडे फुटबॉलला पाय मारत त्याच्या मागे पळण्यात दंग होता. किनार्यावर असलेले छोटे हॉटेल्स पण चालू झाले होते. एका हॉटेलवर रोहीत, अनिकेत, परमवीर, अभिजीत, आधीच जाऊन बसले होते. निरंजन, योगेश, शभम आणि मी सुद्धा तिथे गेलो. आमच्या सगळ्यांची गप्पांची मैफल रंगली. चहा कॉफी झाल्यावर मी, सचिन, निरंजन आणि शुभम फ्रेश होऊन उत्तप्पा point शोधायला गेलो.
“कुठेतरी पाहिलं रे मी” सचिन म्हणाला.
“असेल पुढे कुठेतरी” मी पण उत्तपा सारखं काही दिसतय का याचा शोध घेत म्हणालो. शेवटी एका हॉटेलमध्ये गेलो आणि उपीट ची order दिली. समुद्राच्या दिशेने तोंड करून आम्ही बसलो होतो. काशिद आता जागा झाला होता. समुद्रात बरेच जण खेळताना दिसले. फुटबॉल खेळणारे मात्र पळत-पळत कुठे पळून गेले त्यांनाच माहीत. मुलींचा एक ग्रुप फोटो काढण्यात, pose देण्यात मग्न होता आणि त्यांचा डीएस्एल्आर वाला मित्र उगाचच वाकडातिकडा होऊन फोटो घेत होता. तेवढ्यात दोन तीन वेळा चकरा मारून गेलेला एक घोडेस्वार आमच्याकडे पुन्हा आला.
“अरे मित्रा! अजून खाऊन पण झालेलं नाहीये. खाऊन झालं की बोलवतो तुला” सचिन त्याला म्हणाला. तो तसाच निघून गेला. आमची order आली. उपीट चवदार नव्हतं! हो खरचं! कसतरी संपवायचं म्हणुन खाल्ल. दरम्यान योगेश, अनिकेत, अजय, परमवीर, रोहित, अभिजीत, शिवानंद काय करत होते याचा आम्हाला थांगपत्ता पण नव्हता. खाऊन झाल्यावर लगेचचं आम्ही बाकीच्या मंडळींकडे रवाना झालो. सगळ्यांचच आवरुन झालेलं होतं आणि ते फोटो काढत होते.
काशीद आता एखाद्या फुललेल्या फुलासारखा टवटवीत दिसत होता. पर्यटकांची रेलचेल वाढली होती. जाड-बारीक काळे-गोरे सगळ्या प्रकारचे लोक तिथे जमले होते. वेगवेगळ्या boats आणि त्यांची स्टंटबाजी चालू झाली होती.
“दादा, माझा पण फोटो काढ रे” अभिजीतचा धाकटा भाऊ म्हणाला.
“अनिकेतचं होऊन जाऊदेत. नंतर तुझाच नंबर” योगेश त्याला म्हणाला.
तेवढ्यात “अरे चला ना समुद्रात! निरंजन चल, चल तू पण” शुभम म्हणाला.
“जा तु मी येतो थोड्यावेळात” मी शुभमला म्हणालो.
समुद्राच्या लाटा अलगद माझ्या पायांना स्पर्श करत होत्या. मी त्या दर्याकडे पाहत किनाऱ्यावर उभा होतो, अथांग पसरलेला, अगदी चौफेर! किनारा सुद्धा तेवढाच सामर्थ्यवान! येणाऱ्या प्रत्येक लाटेला स्वतःमध्ये सामावून घेणारा! समुद्र एका लहान मुलासारखा, मस्ती करणारा, तर त्याच्या प्रत्येक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेणारा किनारा म्हणजे वडिलांसारखा! अनिकेत, रोहीत, सचिन, अभिजीत, शिवानंद आधीच समुद्रात खेळताना दिसत होते. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा मलाही आवाहन देत होत्या. मी ही ते आवाहन स्विकारात त्यांच्या दिशेने निघालो. (क्रमश: )
Leave a Reply