‘पूर्वेकडुन पश्चिमेकडे वाहणारी नदी’ अशी आमच्या तापी ची ओळखं. तिचं खोरं आणि पात्र तसं मला फारचं मोठं वाटतं. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी खोल. पण समुद्रासारखं अथांग वाटणारं! मध्यप्रदेशात होणारा उगम ते महाराष्ट्रातून गुजरातेत अरबी समुद्रात एक होणारी ही नदी तिच्या प्रवासात बऱ्याच गावांचा कणा आणि आधार होते. आमचं गावही त्यातलंच एक. गावापासून काही अंतरावर तापी व पांझरा या दोन नद्यांचा संगम आहे. इथेच असणारे महादेवाचे प्राचीन, दगडामध्ये कोरलेले मंदिर संगमाच्या सौंदर्यात शोभेचा तुरा रोवतं. संगमावरची नदीची व्याप्ती आणि पात्र एवढं भव्य आहे की तिने संपूर्ण आभाळाला आपल्या कवेत घेतलयं असं वाटतं.
संगमावरच वातावरण अगदी उत्साही. पक्ष्यांचा किलबिलाट, वाहणारा धुंद वारा, पानांची सळसळ, नजरे समोर पसरलेली तापी, असं एखाद्या निवांत दुपारचं चित्र असतं. एखाद्याला संपूर्ण दिवस तिथेच थांबून घालवावा वाटेल असं ते वातावरण! अशा वातावरणाची सहज ओढ कोणालाही लागू शकते. अर्थातच मी कधीही गावी गेलो की तिकडे जायचा मोह मला आवरता येत नाही. त्यामुळे एक तरी वेळा मी तिथे मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाऊन येतो. तिथल्या वातावरणामुळे मन शांत होऊन जातं. मनाची सगळी गडबड, गोंधळ तापी तिच्या अथांग पात्रात सामावून घेते.
असंच मागच्या आठवड्यात गावी गेलो होतो तेव्हा तिथे जाऊन आलो. तापीने माझं नेहमीप्रमाणे उत्साहाने स्वागत केलं. खरं सांगायचं तर बरच काही बदललं होतं. लोकांची वर्दळ पूर्वीपेक्षा वाढू लागलीये. आजूबाजूला पण मठं वगैरे बनवलाय. मंदिराची पण डागडुजी केलीये. आजूबाजूला बांधकाम बनवलयं. प्रेमाच्या नावाखाली टाईमपास करणाऱ्या मुला-मुलींसाठी कपल पॉईंट झालाय. आम्ही गेलो तेव्हा मंदिरावर कसलीतरी पूजा, हवन वगैरे चालू होतं. मी, माझे काका आणि भाऊ असे तिघेजण महादेवाचे दर्शन घेऊन तापीच्या काठावर गेलो. तिथे एका दगडावर बसून आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या.
तापीचा काठ मला तेवढा तसाच वाटला. माझ्यापेक्षा जास्त बदल या काठाने पाहिला असावा. बरेच पावसाळे पाहिले असावेत. बरेच पूजा, हवनं यात त्याने सहभाग नोंदवला असणार. आणि त्यात हे आता गळ्यात गळे टाकून टाईमपास करणारे मुलं मुली तिथल्या अध्यात्मिक व रम्य वातावरणात घाण करताना पाहणं हे त्याच्यासाठी किती दुर्दैव असेल! माझ्या मते तो कधीकधी हसतही असेल. कारण काही कपल एकट्याने इथे येत नाहीत, तर सोबत दोन-चार लाकडासारखे सुकलेले बॉडीगार्ड घेऊनच येतात. हे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत तोंड पाडून फिरताना पाहून तो काठ नक्कीच हसत असणार. माझं मन असल्या गोष्टीत न अडकता त्या निवांत वातावरणाचा आनंद घेण्यात मग्न होतं. दुपारच्या उन्हात वाऱ्यामुळे गारवा वाटत होता. आम्ही बराच वेळ तिथे बसल्यानंतर निघायची तयारी केली. पायऱ्यांवरून वरती जाताना काही लोकांचा बोलण्याचा आवाज कानी आला.
“अहो घरी गेलो की उरलेली दक्षिणा देतो” साधारण पन्नाशीचं वय असलेला एक गृहस्थ खाली बसलेल्या पंडिताला विनंती करताना दिसला. पण तो पंडित काही ऐकेच ना!
“चालणार नाही. तुम्हाला द्यावेच लागतील” तो पंडित बोलला.
“पंडित जी, आम्हाला घरी जाण्यापूरते तरी पैसे असुद्या. गावात गेलो की नक्की देतो आम्ही उरलेले पैसे” त्या गृहस्थाची अर्धांगिनी हात जोडून त्याला विनंती करू लागली.
“नाही चालणार! परत तुम्हाला पावती पण फाडायची आहे.” पंडित मंतरला. ते कुटुंबं या पंडिताला विनंती करून थकलं. दरवाज्यातच घडणारा हा प्रकार बघून महादेवाची सुद्धा शरमेने मान खाली गेली असणार. अथांग समुद्रासारख्या पाण्याला आवर घालणाऱ्या सामर्थ्यवान काठानेसुद्धा हा प्रकार तटस्थपणे सहन केला असावा. ‘घाणीशिवाय सौंदर्याला किंमत तरी कशी येणार आणि असली कितीतरी प्रकरणे मी वर्षानुवर्षे पाहत अालोय’ असे म्हणत तोही तापीच्या धावणाऱ्या आणि उथळ पाण्याला आवर घालण्यात मग्न झाला असावा.
© Gaurav Sutar
Leave a Reply