‘काशिद’वरची सायंकाळ

(‘काशिदच्या किनाऱ्यावर’ पासून पुढे)
समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद त्यादिवशी घेतला. उंच लाटांवर तरंगत, एकमेकांना सांभाळत, अंदाज न आलेल्या लाटेमुळे खारट पाण्याची चव चाखत बराच वेळ घालवला. सूर्य डोक्यावर आला तेव्हा मात्र आम्ही तिथून काढता पाय घेतला. पाण्यातून बाहेर आलो तेव्हा अंगाला वारा झोंबू लागला. कसंतरी पटकन गाडीतून कपडे घेतले. आंघोळीची आणि कपडे बदलायची सोय जवळच होती. ओले व कोरडे कपडे, पन्नास शंभर ग्राम किनाऱ्यावरची रेती असं सगळं वजन घेत आम्ही आंघोळीचा तळ गाठला. अंघोळीचं पाणी गार होतं, पण त्याने संपूर्ण क्षीण निघून गेला. कपडे बदलले आणि परत किनाऱ्यावर आलो.
आधी झोंबणारा वारा आता मात्र अंगाला हळूवार स्पर्श करत होता. आमची बऱ्यापैकी मंडळी इथल्या हॉटेलवरच होती. कोणी चहा-कॉफी तर कोणी काय घेत होतं. मी मात्र तिथं बांधलेल्या झोक्यावर स्वतःचं अंग टाकून दिलं आणि निवांत पडून राहिलो.
“चला जंजिऱ्याला जाऊन येऊ” सचिन म्हणाला.
“जायचं असेल तर आत्ताच निघावं लागेल. नाहीतर यायला परत उशीर होईल” योगेश म्हणाला.
सगळे तयार झाले. खरंतर किनाऱ्यावरून निघायची माझी इच्छा होत नव्हती, पण कसं तरी मन करून मीही उठलो. तसा किनारा आत्ता खरा ‘बहरू’ लागला होता. आम्ही जवळच्याच हॉटेलवरून चार पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि जंजिऱ्यासाठी निघालो.
गाडीने पाच मिनिटांचं पण अंतर कापलं नसेल, तेवढ्यात सचिन म्हणाला, “काका, द्या मी चालवतो आता”
छोटी चार चाकी असती तर काही वाटलं नसतं पण वीस तीसचा व्हील बेस असणारी एवढी मोठी गाडी चालवणार म्हटल्यावर सगळ्यांनाच धडकी भरली. काकाने पण जोश मध्ये गाडी कडेला घेतली. ड्रायव्हिंग सीटवर आता आमचा मित्र सचिन बसला होता. पहिल्या गिअरवर गाडी उचलताच आम्ही सगळे सीटकडे फेकलो गेलो. गाडी रस्त्याला लागली. सगळ्यांच्या झोपा उडाल्या होत्या. एखादा कॅप्टन असल्याप्रमाणे सगळेजण आता रस्त्यावर पुढे पाहात होते. समोरून काही आलं, की गाडीतले काहीजण ‘अरे सचिन कार येतीये, अरे सचिन माणूस चाललाय, सायकलवाल्याला सांभाळ, सचिन हे, सचिन ते’ अशा सूचना करत होते.
“तुम्ही काळजी करू नका, मी चालवतो बरोबर” त्यांच्या सूचना ऐकून सचिन त्यांना म्हणे. तरीसुद्धा समोरून किंवा बाजूने काही जरी आलं तरी त्याला सूचना चालूच होत्या.
एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला कौलाची घरं, सुपारीची, नारळाची उंचच उंच झाडं, यातून मार्ग काढत आमची गाडी जात होती. थोड्यावेळात चेक पॉईंट आला. अर्ध्या पाऊन तासांचा तो प्रवास खूपच वेळ चालल्यासारखं वाटलं. तिकीट घेतलं आणि गाडी वाहनतळावर लावली.
सगळ्यांचे हृदयाचे ठोके बहुदा साधारण झाले होते. दुपारची रणरणत्या उन्हाची ती वेळ. भूक लागली होती म्हणून सगळेजण एखाद्या हॉटेलच्या शोधात निघालो. थोडा वेळ चालल्यानंतर एक चांगले हॉटेल दिसले. तिथे मिळेल ते चार घास खाल्ले आणि बोटीचं तिकीट काढायला रवाना झालो.
तिकीट घेतल्यानंतर आम्ही बोटीसाठी वाट पाहत थांबलो. बोट आल्यानंतर त्या माणसाने आम्हा सगळ्यांना बसण्यासाठी ओळीने सोडले. सगळेजण बसल्यानंतर किल्ल्यापर्यंतची सैर सुरू झाली. तसं नावेतं साधारण पंचवीस तीस जण असतील. एका बाजूच्या वजनामुळे कदाचित नाव झुकलेली होती.
“अरे गौरव नाव पलटी तर होणार नाही ना? किती तिरकी झाली आहे” सचिन मिश्कीलपणे म्हणाला असावा. त्यानं असं म्हटल्याबरोबर जवळच असणाऱ्या मुलीने मला आणि सचिनला एक ‘लूक’ दिला.
साधारण वीस मिनिटात जंजिरा च्या दरवाजावर आम्ही पोहोचलो. मुख्य द्वारातून आम्ही वरती गेलो. तसं आम्हाला गाईड वगैरे करायच्या भानगडीत पडायचं नव्हतं पण आमचा ग्रुप बघून त्याने किंमत कमी केली आणि मग त्या बिनकामाच्या गाईडमागे आम्हाला फिरावं लागलं. त्याने पण दोन-चार स्पॉट दाखवले व 45 मिनिटे संपवले आणि स्टाईल ने म्हणाला की हा संपूर्ण किल्ला बघायला तुम्हाला एक दिवसाचा वेळ ही पुरला नसता. मी म्हणतो याला काय एवढी पडली आहे! आम्ही एका दिवसात बघू नाहीतर दहा दिवसात बघू! तंबू टाकुन इथेच राहू. लागू दे वेळ! तुझं काम काय, तू बोलतो काय. पण नाही! चार सुंदर मुली दिसल्या की त्यांच्यासमोर असली माणसं बढाया मारायचा चान्स सोडतच नाहीत. आमची नाव आल्यावरती आम्ही सगळेजण त्यात जाऊन बसलो. गर्दी वाढली होती म्हणून निघायला अवकाश होता. मी सहज इकडे तिकडे निरीक्षण करत असताना माझ्या लक्षात आलं की एक मुलगी माझ्याकडे पाहत होती. मी पहिले दुर्लक्ष केलं, पण तिने तसं केलं नसल्याचं मला आढळलं. गॅलिलिओला चंद्र आवडल्यावर ज्या आवडीने त्याकडे पाहत असावा तेवढ्याच आवडीने ती माझ्याकडे पाहत होती. फरक एवढाच होता तिथे गॅलिलिओ चंद्राकडे पाहत होता आणि इथे खुद्द चंद्र गॅलिलिओकडे बघत होता. इतिहासातल्या गॅलिलिओला चंद्र त्याच्याकडे येणार नाही याची खात्री होती, पण ह्या गॅलिलिओला तो चंद्र तिथून उठून जवळ बसायला येतो की काय याची शंका वाटू लागली होती. कारण तिच्यात आणि माझ्यात फक्त एकच नाव होती. ती सहजच त्या नावेवरून माझ्या नावेवर आली असती. सुदैवाने आमची नाव निघाली आणि पंधरा मिनिटांपासून चाललेला तो रंगीत तालमीचा खेळ संपला तेव्हा त्या बिचारीचा चेहरा पडलेला मला जाणवला. आता, तो आकाशातला चंद्र एवढी वर्षे झाली पृथ्वीभोवती घिरट्या घालतोय पण त्याच्या हाती अजून काही यश आले नाही, मग हा जमिनीवरचा चंद्राचा तुकडा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?
दुपारचे चार वाजले होते. आमचा परतीचा प्रवास चालू झाला. उन्हाने तापलेल्या त्या गाडीत आम्ही कसेतरी बसून होतो.
“संध्याकाळी थोडा वेळ थांबू परत किनाऱ्यावर. काय वाटतं तुम्हाला?” सचिन ने विचारलं.
सगळे जण तयार झाले.
आम्ही थोड्याच वेळात परत त्याच किनाऱ्यावर आलो. काही जणांनी कॉफी, तर काहीजणांनी चहा घेतला. किनाऱ्यावरची गर्दी कमी होत होती. कॉफी वगैरे झाल्यावर मी, निरंजन व शुभम चौपाटीवर फेरफटका मारायला निघालो. सायंकाळची कोमल किरणं समुद्राला आणि चौपाटीला आंघोळ घालत होते. मधूनच थोडेफार पक्षी दिसत होते. लाटांचा आवाज थोडा सौम्य झाल्यासारखा वाटला. काही लोकं अजूनही पाण्यात कसरती करत होते.
साधारण साडेपाच सहाच्या दरम्यान लाल-तांबड्या रंगांची उधळण करत सुर्याने समुद्रात डुबकी मारली. हवेतला गारवा आता हळूहळू वाढू लागला होता. लोकांची गर्दी कमी झाली होती. आम्ही पण त्या किनाऱ्याला उरल्यासुरल्या पर्यटंकासोबत सोडुन परतीचा प्रवास सुरू केला.
©Gaurav Sutar

7 thoughts on “‘काशिद’वरची सायंकाळ

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: