नुकतच राष्ट्रगीत म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो. आमचे वर्गशिक्षक, थोरात सर हजेरी घेत होते. तेवढ्यात, “मे आय कम इन सर?” असा अशक्त आवाज दारातून आला. अंगाने एकदम सडपातळ, सावळ्या वर्णाचा, आमचा मित्र अक्षय खोकलत, छाती धरत दारात उभा होता.
“अरे अक्षय, ये ना, आज उशीर कसा काय झाला?” थोरात सरांनी विचारले.
“दवाखान्यात गेलो होतो” हातातल्या रुमालाने नाक पुसत अक्षय म्हणाला.
“बस बस” सरांनी असं म्हणाल्यावर तो पाठीवरची बॅग सांभाळत बेंचवर येऊन बसला.
मधली सुट्टी झाली तेव्हा जेवताना त्याला आम्ही विचारपूस केली.
“माहीत नाय, पण त्रास होतोय. सर्दी खोकला आणि थोडं छातीत दुखतयं. म्हणूनच डॉक्टर कडं गेलतो” अशक्तपणे तो पुढे म्हणाला, “अासं पण दहावीचं महत्त्वाचं वर्षयं, त्याचंपण टेन्शन हाय आणि त्यात हे आजारपण”
दिवसामागून दिवस जात होते. अभ्यासक्रम बऱ्यापैकी संपला होता. पण त्याचं आजारपण काही संपलेलं दिसत नव्हतं. नंतर बरेच दिवस तो शाळेत आला नाही. समजलं की तो जास्त आजारी पडला होता. पंधरवड्यानंतर आला तेव्हा अजून बारीक झालेला दिसला.
“आता ठीक वाटतयं, पण छातीतलं दुखणं कमी झालं नाहीये. एवढ्या याच्यात ६० टक्के पडले तरी लय खुश होईल मी” तो म्हणाला.
मध्ये बराच कालावधी लोटला. मार्च उजाडला तो परीक्षेेचं टेन्शन घेऊनचं. आम्हाला तेव्हा सांगितलं होतं दहावीत चांगले मार्क मिळाले की झालं मग पुढचा मार्ग सोपा असतो. त्यामुळे थोडं टेन्शन मध्ये मार्च गेला. परीक्षा संपली आणि अंगावरचं ओझं कुणीतरी उचलून ठेवल्यासारखं वाटलं. पण आठवडाही झाला नसेल तेव्हा समजलं की अक्षय जग सोडून गेला. सुरुवातीचे काही दिवस मला विश्वास बसला नाही पण सत्य कधीच नाकारता येत नाही.
अक्षयला आई नव्हती. वडील आणि बहिणी सोबत तो राहायचा. त्याची ओळख म्हणजे वर्गातील शांत विद्यार्थी. कधीच कोणाशी भांडलेला तर दूरच, पण ओरडलेलासुद्धा लांब लांब पर्यंत आठवत नाही. नेहमी त्याच्या छोट्याश्या जगात असायचा. वळणदार अक्षर, नीटनेटक्या वह्या-पुस्तकं, टापटिप राहणं ही त्याची दुसरी ओळख. बारक्या खांद्यावर त्याच्यापेक्षाही मोठी वाटणारी बॅग घेऊन शांतपणे यायचा आणि शांतपणे जायचा. भाबडेपणा ही त्याच्या स्वभावाची दुसरी बाजू. कधी कोणाच्या अधात-मधात नाही, कधी कोणाला त्रास नाही, असा तो अक्षय.
दोन-तीन महिन्यात दहावीचा निकाल लागला. पठ्ठ्याने ७०% मिळवले होते. जे बोलला त्याहून जास्त करून दाखवलं होतं. पण त्याने गाठलेलं ध्येयं पहायला तोच या जगात नव्हता. त्याला खरंच आनंद झाला असता.
ते म्हणतात, हे शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर राहतो. कदाचित ते म्हणतात त्याप्रमाणे त्याने दुसरा जन्म घेतलाही असेल किंवा आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग यांच्या थिअरी प्रमाणे तो दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जगतही असेल. पण हे जग त्याने २०११ मध्ये सोडलं. त्या दिवशी ‘दहावी फ’ ने एक अमूल्य विद्यार्थी आणि मित्र गमावला. पण तो आजही आमच्या सोबत आहे. कधी शाळेतल्या बेंचवर बसलेला, मैदानावर पीटीच्या तासाला शांतपणे एका सावलीत उभा असलेला तो, शाळेच्या आठवणीत, आमच्या आठवणीत आजही जिवंत आहे, ज्या नावाप्रमाणेच कायमच्या ‘अक्षय’ आहेत.
जीवनाची वाट अर्ध्यातच सोडून अनंतात विलीन झालेल्या अक्षय भुजबळ ला समर्पित.
माझ्या खूप जवळचा होता ,,,,, त्याचे जे रूप मी पहिले होते ते कोणीच पहिले नसेल कदाचित ,,,, मला वर्ष आठवत नाहीये पण होळीची वेळ होती ,,,, गडी त्यांच्याइथल्या पोरांसोबत पाण्याच्या पिशव्या घेऊन आमच्या इथे आमच्या अंगावर फोडण्यासाठी आला होता,,,, पहिल्यांदा मी त्याला इतके आनंदात पहिले होते ,,,,,, पण ते शेवटचे असेल माहिती न्हवते,,,, असोत कदाचित देवाला तो खूप जास्त आवडत असेल,,,,
LikeLiked by 2 people
so sad………..
death is ultimate truth of life…………..
LikeLike